Svoboda | Graniru | BBC Russia | Golosameriki | Facebook
Jump to content

टेनेसी नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

टेनेसी नदी अमेरिकेच्या केंटकी, टेनेसी, अलाबामा आणि मिसिसिपी राज्यांतील मोठी नदी आहे. ही नदी नॉक्सव्हिल शहराजवळील हॉल्सटन आणि फ्रेंच ब्रॉ़ड नद्यांच्या संगमापासून सुरू होते व नैऋत्येकडे वाहते. चॅटानूगा शहराजवळून ही नदी अलाबामामध्ये प्रवेश करते व तेथे वायव्येकडे वळण घेत मिसिसिपीच्या ईशान्य कोपऱ्यातील सीमेवरून परत टेनेसी राज्यात येते. येथून उत्तरेकडे वाहत टेनेसी नदी केंटकी राज्यात जाते व पाडुका शहराजवळ ओहायो नदीस मिळते.

टेनेसी नदीचा प्रवाह १,०४९ किमीचा असून पाणलोट क्षेत्र सुमारे १,०५,८६८ किमी आहे. या नदीवर टेनेसी व्हॅली ऑथोरिटीने बांधलेली अनेक धरणे आणि बंधारे आहेत. यांचा उपयोग सिंचनाशिवाय पूरनियंत्रणासाठी होतो.

नॉक्सव्हिल, चॅटानूगा, हंट्सव्हिल, पाडुका ही या नदीकाठची काही प्रमुख शहरे आहेत.