Svoboda | Graniru | BBC Russia | Golosameriki | Facebook
Jump to content

पशुपतिनाथ मंदिर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पशुपतिनाथ मंदिर
पशुपतिनाथ मंदिर
पर्यायी चित्र
पशुपतिनाथ मंदिर
पर्यायी नकाशा
पर्यायी नकाशा
पशुपतिनाथ मंदिर
नेपाळ मधील मंदिराचे स्थान
नाव
संस्कृत पशुपतिनाथमन्दिरम्
मराठी पशुपतिनाथ मंदिर
भूगोल
गुणक 27°42′35″N 85°20′55″E / 27.70972°N 85.34861°E / 27.70972; 85.34861गुणक: 27°42′35″N 85°20′55″E / 27.70972°N 85.34861°E / 27.70972; 85.34861
देश नेपाळ
राज्य/प्रांत बागमती नदी
जिल्हा काठमांडू
स्थानिक नाव पशुपतिनाथ मंदिर
स्थान काठमांडू
संस्कृती
मूळ आराध्यदैवत पशुपति
महत्त्वाचे उत्सव महाशिवरात्र, तीज, बला चतुर्दशी
स्थापत्य
स्थापत्यशैली पॅगोडा
इतिहास व प्रशासन
स्थापना इ.स. पूर्व ४३८०
बांधकामाचे वर्ष ५ वे शतक
संकेतस्थळ अधिकृत संकेतस्थळ

पशुपतिनाथ मंदिर हे एक नेपाळ देशातील काठमांडू मधील बागमती नदीच्या काठावर वसलेले शिव मंदिर आहे. या मंदिर संकुलाचा इ.स. १९७९ मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला. तसेच हे युनेस्कोच्या नेपाळ मधील जागतिक वारसा असलेलया काठमांडू व्हॅलीच्या सात स्मारकांपैकी एक आहे.[१]

हे मंदिर जांबूद्वीप क्षेत्रावरील तामिळ पादल पेट्र स्थलम (महादेवाचे पवित्र शिवलिंग) मधील २७५ लिंगापैकी एक आहे. शिव पुराणातील कोटिरुद्र संहितेच्या अकराव्या अध्यायात याचा उल्लेख 'उत्तरे कडील सर्वात पवित्र आणि महत्त्वाचे शिवलिंग असून सर्व इच्छांचा दाता' असा आहे. धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनण्यापूर्वी नेपाळ हे एक हिंदू राष्ट्र होते. त्याकाळी पशुपति ही नेपाळची राष्ट्रीय देवता तथा आराध्य दैवत होते.[२]

इतिहास[संपादन]

पशुपतीनाथ मंदिराच्या बांधकामाची अचूक तारीख अद्याप निश्चित माहीत झालेली नाही. तथापि, या मंदिराचे सध्याचे स्वरूप इ.स. १६९२ मध्ये बांधले गेलेले आहे. कालांतराने या दुमजली मंदिराभोवती आणखी अनेक मंदिरे उभारली गेली आहेत. यामध्ये १४व्या शतकातील राम मंदिरासह वैष्णव मंदिर परिसर आणि ११व्या शतकातील हस्तलिखितात नमूद केलेल्या गुह्येश्वरी मंदिराचा समावेश आहे.[३]

पशुपतीनाथ मंदिर हे काठमांडूमधील सर्वात जुने हिंदू मंदिर आहे. पशुपतिनाथ मंदिर कधी बांधले गेले हे निश्चितपणे माहित नाही. परंतु नेपाळ महात्म्या आणि हिमवतखंडा यांच्या मते पशुपतिनाथ मंदिराचे अस्तित्व 400 ईसापूर्व आहे. भरपूर सुशोभित पॅगोडामध्ये पवित्र लिंग किंवा भगवान शिवाचे पवित्र चिन्ह आहे.[४]

गोपालराज आलोक यांच्या मते वट भेन्सिस मंदिर लिच्छवी राजा 'प्रचंड देवाने' बांधले होते. इ.पूर्व ७५३ मध्ये पशुपतिनाथाच्या प्रांगणात जयदेव-११ याने उभारलेल्या एका शिलालेखानुसार, राजा प्रचंड देव हा मानदेवाच्या(४६४-५०५) ३९ पिढ्या आधीचा शासक होता.

सुपुस्प देवाने या ठिकाणी पशुपतीनाथाचे पाच मजली मंदिर बांधण्यापूर्वी पशुपतीनाथ मंदिर लिंगाच्या आकाराचे देवालयाच्या रूपात होते असे आणखी एका इतिहासात नमूद केले आहे. जसजसा काळ लोटला तसतशी या मंदिराची दुरुस्ती आणि जीर्णोद्धार करण्याची गरज निर्माण झाली. हे मंदिर शिवदेव इ. पू. (१०९९-११२६) नावाच्या मध्ययुगीन राजाने पुनर्बांधणी केल्याचे ज्ञात आहे. अनंता मल्ल यांनी छत जोडून त्याचे नूतनीकरण केले. जगभरातून हजारो भाविक यात्रेकरू या मंदिराला भेट देण्यासाठी येत असतात, या मंदिराला 'जीवितांचे मंदिर' असेही म्हणतात.[५][६]

लिंगाचे स्वरूप[संपादन]

पवित्र गर्भगृह, किंवा मुख्य मूर्ती हे चांदीच्या सर्पाने बांधलेले चांदीची योनी आधार असलेले दगडी मुखलिंग आहे. हे शिवलिंग एक मीटर उंच असून त्याला चार दिशांना चार तोंडे आहेत. हे चेहरे शिवाच्या पुढील विविध पैलूंचे प्रतिनिधित्व करतात - जसेकी सद्योजता (बरुण म्हणूनही ओळखले जाते), वामदेव (अर्धनारेश्वर म्हणूनही ओळखले जाते), तत्पुरुष, अघोर आणि इशान (कल्पनाशीलता). पश्चिम, उत्तर, पूर्व, दक्षिण आणि शिखर किंवा अवकाश अनुक्रमे पृथ्वी, पाणी, हवा, प्रकाश आणि ईथर या पाच प्राथमिक घटकांचे प्रतिनिधित्व करतात.[७] प्रत्येक चेहऱ्यावर लहान पसरलेले हात असून उजव्या हातात रुद्राक्षाची माळ आणि दुसऱ्या हातात कमंडलू आहे. भारत आणि नेपाळमधील इतर शिवलिंगांप्रमाणे हे पशुपती शिवलिंग नेहमीच सोन्याच्या वस्त्रात परिधान केलेले असते. अभिषेकासाठी दूध आणि गंगाजल वापरले जाते, जो केवळ मुख्य पुजाऱ्यांमार्फतच केला जातो. पशुपतीनाथाचे मुख्य मंदिर परिसर आणि गर्भगृह अभंग राहिले होते. परंतु जागतिक वारसा स्थळातील काही बाह्य इमारती एप्रिल २०१५ च्या नेपाळ भूकंपामुळे खराब झाल्या.[८]

प्रवेशद्वार[संपादन]

The western entrance of main temple courtyard
Pandra Shivalaya and ghat (viewpoint for tourist from adjacent side of river Bagmati, East of the main temple)

मंदिराच्या प्रांगणात चार प्रमुख दिशांना एकेक प्रवेशद्वार आहेत. पश्चिमेकडील प्रवेशद्वार हे मंदिराच्या प्रांगणाचे मुख्य प्रवेशद्वार आहे आणि उर्वरित तीन प्रवेशद्वार केवळ सणासुदीच्या वेळीच खुले असतात. मंदिर सुरक्षा (सशस्त्र पोलीस दल नेपाळ) आणि पशुपतीनाथ क्षेत्र विकास ट्रस्ट यांनाच केवळ आतील अंगणात प्रवेश आहे. दक्षिण आशियाई प्रवासी हिंदू आणि नेपाळी आणि तिबेटी प्रवासी बौद्धांना केवळ मंदिराच्या प्रांगणात प्रवेश दिला जातो. पाश्चात्य वंशाच्या हिंदूंना मंदिराच्या संकुलात प्रवेश दिला जात नाही. त्यांना इतर, गैर-हिंदू भाविकांप्रमाणे ठराविक अंतरापर्यंत प्रवेश दिला जातो. शिख आणि जैन यात अपवाद आहे; जर ते भारतीय वंशाचे असतील तर ते मंदिराच्या परिसरात प्रवेश करू शकतात. इतर लोक नदीच्या लगतच्या बाजूने मुख्य मंदिर पाहू शकतात आणि मंदिर परिसराच्या बाहेरील आवारात असलेल्या शेकडो लहान मंदिरांना भेट देण्यासाठी त्यांना १०अमेरिकन डॉलर (अंदाजे १००० नेपाळी रुपये)ची नाममात्र फी भरावी लागते.[९]

मंदिराचे आतील प्रांगण भाविकांसाठी पहाटे ४ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत खुले असते. परंतु आतील पशुपतीनाथ मंदिर जेथे भगवान पशुपतीनाथाच्या लिंगाची स्थापना केली जाते, ते 'प्रातःकालीन पूजा' व दर्शनासाठी पहाटे ५ ते १२ वाजेपर्यंत आणि सायंकाळी 'संध्याकाळच्या पूजा' व दर्शनासाठी ५ ते ७ वाजेपर्यंत खुले असते. इतर अनेक शैव मंदिरांप्रमाणे, भक्तांना गर्भगृहाच्या आतील भागात प्रवेश करण्याची परवानगी नाही परंतु गर्भगृहाच्या बाहेरील आवारातून पाहण्याची परवानगी आहे. मंदिर बंद होण्याच्या वेळा हंगामानुसार बदलतात. नोव्हेंबरमध्ये ते संध्याकाळी ६:३० वाजता बंद होते. पुढे अजून जर प्रकाश लवकर कमी झाल्यास ते अजून लवकर बंद होते. उन्हाळ्यात ते रात्री ८:०० वाजता बंद होते.

आख्यायिका[संपादन]

पशुपतिनाथाच्या उत्पत्तीच्या अनेक गुंतागुंतीच्या कथा आहेत. हे भगवान पशुपतिनाथाचे मंदिर कसे अस्तित्वात आले याचे वर्णन करणाऱ्या अनेक आख्यायिका आहेत. त्यापैकी काही खाली वर्णन केल्या आहेत.

एक कथा अशी आहे की, शिव आणि पार्वती फिरतफिरत काठमांडू खोऱ्यात आले आणि विश्रांतीसाठी बागमतीजवळील जंगलात विसावा घेतला. शिव जंगल आणि सभोवतालच्या परिसराच्या सौंदर्याने इतके मोहित झाले की ते आणि पार्वती हरणात रूपांतरित होऊन जंगलात भटकू लागले. काठमांडू खोऱ्यातील अनेक ठिकाणे अशी ठिकाणे म्हणून ओळखली गेली आहेत जिथे शिव त्याच्या काळात हरीण म्हणून गेले होते. काही काळाने ब्रह्मदेव आणि इतर देवता शिवाचा शोध घेऊ लागले. शेवटी एकदाचे त्यांना शिव या जंगलात सापडले. देवता तर खुश झाल्या परंतु शिवाने जंगल सोडण्यास नकार दिला. पुढे आणखी गुंतागुंत निर्माण झाली आणि शेवटी भगवान शिवाने जाहीर केले की, तो बागमती नदीच्या काठी हरणाच्या रूपात राहत असल्याने, त्याला आता पशुपतिनाथ म्हणजे 'सर्व प्राण्यांचा देव' म्हणून ओळखले जाईल. असं म्हटलं जातं की जो कोणी इथे आला आणि येथील शिवलिंगाचे दर्शन आणि पूजन केले तो परत प्राणी म्हणून कधीही पुनर्जन्म घेणार नाही.

हरणाच्या रूपातील शिवाला जेव्हा ब्रह्मदेवाने त्याचे शिंग धरून पकडले होते, तेव्हा या शिंगाचे तुकडे झाले होते. या तुटलेल्या शिंगाचीच शिवलिंग म्हणून पूजा केली जात होती. परंतु कालांतराने ते शिवलिंग गाडले गेले आणि हरवले गेले. शतकानुशतका नंतर कामधेनूने चंद्रवन पर्वतावरील एका गुहेत आश्रय घेतला. दररोज कामधेनू शिवलिंग जेथे मातीत गाडल्या गेले होते, त्या ठिकाणी जाऊन ती आपला पान्हा तेथे सोडत असे. एकदा काही लोकांनी कामधेनूला त्याच जागेवर रोज दूध ओतताना पाहिले आणि ती असे का करत असेल याचा त्यांना प्रश्न पडला. म्हणून एकदिवस त्यांनी माती खोदून तेथून सुंदर चमकणारे शिवलिंग शोधून काढले आणि त्याची पूजा करू लागले.

दुसऱ्या एका आख्यायिके नुसार जेव्हा महाभारताचे युद्ध संपले तेव्हा तेथील प्रचंड जीवितहानी आणि आपल्या काही प्रिय भक्तांचा विनाश पाहून भगवान शिव अत्यंत दुःखी झाले. आपले मन रमवण्यासाठी ते गुप्तरूपांत केदारनाथ येथे राहू लागले. जेव्हा स्वर्गारोहणाची वेळ आली तेव्हा पांडवांना निष्कांटक स्वर्गात प्रवेश मिळावा म्हणून भगवान श्री कृष्णाने त्यांना शिव दर्शनाचा सल्ला दिला. शिवाला शोधत शोधत पांडव केदारनाथला आले. एका म्हशीच्या कळपात शिवजी रेडा बनून लपले होते, परंतु शेवटी भीमाने शिवाला ओळखलेच. यामुळे रेडा रुपी शिव तिथेच जमिनीत घुसले. त्यावेळी भीमाने त्यांना शेपटी धरून पकडून ठेवले. हाच शेपटीवाला पार्श्वभाग केदारनाथ तर जमिनीतून दूर नेपाळमध्ये बाहेर पडलेले मुखाचा भाग पशुपतिनाथ म्हणून ओळखला गेला.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "SAARC tourism". २२ जुलै २०१० रोजी मूळ पान पासून संग्रहित. ७ नोव्हेंबर २०२१ रोजी पाहिले.
  2. ^ "मोदी ने किया भगवान पशुपतिनाथ का रुद्राभिषेक". नवभारत टाईम्स. ४ ऑगस्ट २०१४. १२ ऑगस्ट २०१४ रोजी मूळ पानापासून संग्रहित. ७ नोव्हेंबर २०२१ रोजी पाहिले.
  3. ^ Sharma, Prayag. "A fresh look at the origin and forms of early temples in the Kathmandu Valley" (PDF). Contributions to Nepalese Studies. Centre for Nepal and Asian Studies (CNAS). 26: 1–25. 2 August 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). 21 March 2021 रोजी पाहिले.
  4. ^ "Sacred destinations". Kathmandu, Nepal: Sacred destinations. 5 May 2009. 1 May 2009 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 30 October 2011 रोजी पाहिले.
  5. ^ "Pashupatinath". Nepal.saarctourism.org. 22 July 2010 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 5 August 2014 रोजी पाहिले.
  6. ^ "holy symbol". Mahashivratri.org. 25 July 2014 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 5 August 2014 रोजी पाहिले.
  7. ^ Encyclopaedia of Saivism Archived 1 May 2016 at the Wayback Machine., Swami P. Anand, Swami Parmeshwaranand, Publisher Sarup & Sons, आयएसबीएन 8176254274, आयएसबीएन 9788176254274, page 206
  8. ^ "Nepal earthquake death toll rises to 8,413". टाइम्स ऑफ इंडिया. 2015-05-10 रोजी मूळ पानापासून संग्रहित. ७ नोव्हेंबर २०२१ रोजी पाहिले.
  9. ^ Mayhew, Bradley; Bindloss, Joe; Armington, Stan (2006). Nepal. Lonely Planet. p. 166. ISBN 978-1-74059-699-2. Pashupatinath.