रिक्षा चालवून बनला यूट्यूबर, मिळवले 60 लाख फॉलोअर्स, इरफानने कसे मिळवले यश?

MOHAMED IRFAN/FB

फोटो स्रोत, MOHAMED IRFAN/FB

  • Author, अश्फाक
  • Role, बीबीसी तमिळ

"मी तीन वर्षांपासून रिक्षा चालवत आहे. रिक्षात स्कूलबॅग भरतो आणि मुलांना घेऊन निघतो. मी ओम्नी व्हॅनही चालवतो. सेनचिट्टे कॉलेजमध्ये मी हे काम शिकलो. आम्हाला भाडं भरण्यासाठी संघर्ष करावा लागायचा. किराणा सामानही उधारीवर घ्यावं लागत होतं. अनेकदा ती उधारी किंवा कर्जही फेडणं शक्य होत नव्हतं. पण मला वाटतं की आपण सातत्यानं एकाच दिशेनं प्रयत्न करत राहिलो तर नक्कीच प्रगती करू शकतो. ईश्वराच्या कृपेनं मी आज इथपर्यंत पोहोचू शकलो."

हे शब्द आहेत प्रसिद्ध युट्यूबर इरफान याचे.

कुरळे केस, बोलण्यात आत्मीयता आणि लोभस आवाज...हा आहे इरफान.

'इरफान्स व्ह्यू' नावाचं त्याचं यूट्यूब चॅनल हे केवळ तमिळनाडूच्याच नव्हे तर इतरही अनेक फूड लव्हर्ससाठी मार्गदर्शक आहे.

इरफान मूळचा चेन्नईचा. शाळा आणि महाविद्यालयातही तो अभ्यासात त्याची प्रगती इतर मुलांसारखी सरासरी होती. मध्यमवर्गीय कुटुंबात लहानाचा मोठा झालेल्या इरफानला अभिनयाची आवड होती. त्यामागची मूळ इच्छा प्रसिद्धी मिळवण्याची होती.

त्यानं नोव्हेंबर 2016 मध्ये त्याचा व्लॉगर म्हणून प्रवास सुरू केला. त्यावेळी यूट्यूबकडं फारसं कोणी आकर्षित झालेलं नव्हतं.

MOHAMED IRFAN/FB

फोटो स्रोत, MOHAMED IRFAN/FB

इरफाननं या चॅनलसाठी प्रचंड परिश्रम घेतले. त्यानं चांगल्या नोकरी सोडल्या आणि पूर्णवेळ यूट्यूबर म्हणून काम करू लागला. त्या जोरावर त्याचे फक्त यूट्यूबवर तब्बल 40 लाखांच्या जवळपास फॉलोअर्स आहेत.

फेसबुक आणि इन्स्टाग्राम सर्वांचा एकत्रितपणे विचार करता इरफानचे सोशल मीडियावर एकूण 60 लाख फॉलोअर्स आहेत. सिंगापूरच्या एकूण लोकसंख्येइतका हा आकडा आहे.

इरफान चित्रपट समीक्षण, फूड रिव्ह्यू, विविध भागांतील पदार्थांची माहिती, विदेश यात्रा, सेलिब्रटींच्या मुलाखती आणि कधी तरी विशेष शोच्या माध्यमातून वेगळ्या प्रकारचा कंटेंट तयार करतो. त्यामुळं केवळ तरुणच नव्हे तर त्याच्या चाहत्यांमध्ये प्रौढांचाही समावेश आहे.

आम्ही एके दिवशी सकाळी इरफानला चेन्नईतील त्याच्या ऑफिसमध्ये भेटलो. त्यानं सुरुवातीच्या काळातील प्रवास, कामाचा ताण, यूट्यूबर्सची प्रगती, सेलिब्रिटींबरोबरच्या मुलाखती, नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेला 2024 चा नॅशनल क्रिएटर अवॉर्ड याबाबत आमच्याशी चर्चा केली.

त्याच्याबरोबर झालेल्या रंजक चर्चेचा काही भाग इथे देत आहोत.

इरफानचा प्रवास त्याच्याच शब्दांत देत आहोत.

आव्हानांचा सामना करत स्वप्नांचा पाठलाग

यूट्यूबर म्हणून प्रवास करण्यापूर्वी मी एका बीपीओ कंपनीत काम करत होतो. मला प्रसिद्धी मिळवण्याची इच्छा होती. पण ते एवढं सोपं नाही हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळं मी यूट्यूब चॅनल सुरू केलं.

मी आठवड्याला एक व्हिडिओ तयार करायचो आणि पोस्ट करायचो. मी त्याचदिवशी ठरवलं होतं की, मी एक काम करायला सुरुवात केली तर त्यात सातत्य ठेवावं लागेल. सुरुवातीला ज्याप्रकारे सातत्य ठेवून काम केलं ते आजही करत आहे.

MOHAMED IRFAN/FB

फोटो स्रोत, MOHAMED IRFAN/FB

मी 2016 मध्ये एका रेस्तराँमध्ये मॅनेजर म्हणून काम करत होतो. मी सुटीवर होतो तेव्हा आठवड्याला एक व्हिडिओ पोस्ट करण्याची सवय लावून घेतली होती. एक क्षण असा आला होता जेव्हा मी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आणि पूर्ण वेळ यूट्यूबर बनलो. मला तेव्हा घरातूनही विरोध झाला. यूट्यूबसाठी नोकरी सोडल्यानं अनेकांना वाईट वाटलं होतं.

पण मला भाडं भरण्यासाठी संघर्ष करावा लागत होता. किराणा सामानाची खरेदी करण्यासाठीही आर्थिक तंगीमुळं अडचणी येत होत्या. पण सर्वकाही प्रचंड मेहनत करूनच ठीक करता येऊ शकतं, यावर माझा ठाम विश्वास आहे.

मी यूट्यूबर म्हणून प्रचंड परिश्रम घेतले. काम सोडल्यानंतर माझ्या लक्षात आलं की, आठवड्याला एक व्हिडिओ पोस्ट करणं हे पुरेसं नाही. त्यामुळं मी रोज व्हिडिओ पोस्ट करायला सुरुवात केली. त्याद्वारे मी आज इथपर्यंत पोहोचू शकलो.

दिवसा रिक्षा चालवायची आणि संध्याकाळी कॉलेज

माझे वडील व्हॅन ड्रायव्हर आहेत. त्यांच्याकडं ओम्नी व्हॅन आणि रिक्षाही आहेत. ते मुलांना शाळेत नेऊन सोडायचं आणि परत आणण्याचं काम करतात. त्यांच्यासारखीच मीही 3 वर्षे रिक्षा चालवली.

मी सकाळी आणि दुपारी दोन वेळा शाळेच्या मुलांना नेऊन सोडायचो. हे काम रोज करावंच लागायचं. मी ओम्नी व्हॅनही चालवली. त्यानंतर मी कॉलेजला जात होतो.

MOHAMED IRFAN/FB

फोटो स्रोत, MOHAMED IRFAN/FB

सर्वात पहिली बाब म्हणजे मी मोठा यूट्यूबर होईल यावर मलाच विश्वास नव्हता. यूट्यूबर्सना त्यांचं स्वतःचं असं एक व्यासपीठ मिळत असतं. मला असे पुरस्कार मिळतील हे कधी वाटलंही नव्हतं.

यूट्यूबद्वारे एवढी कमाई करता येऊ शकते याची मला तेव्हा कल्पनाच नव्हती. मी अभिनेता असतो तरी मला एवढी प्रसिद्धी मिळाली नसती, असं मला अनेकदा वाटतं.

आता मी यूट्यूबर म्हणून कुठेही गेलो तरी लोकं माझं प्रेमानं स्वागत करतात. शाळा-कॉलेजमध्ये मला गेस्ट म्हणून बोलावलं जातं. ते मला यूट्यूबबाबत क्लास घेण्यास सांगतात. लोकांनी मला ओळख मिळवून दिली असं मला वाटतं.

'कामाच्या ताणानं तणाव वाढला'

मी कंपन्यांमध्ये काम करायचो तेव्हाही मला दोन दिवसांची सुटी मिळायची. रोज 9 तास असं पाच दिवस काम करायचं आणि वीकेंडला आराम करायचा. पण या व्यवसायात सुटीच मिळत नाही.

पण उद्योजक म्हणून ही चांगली बाब आहे असं म्हणता येईल. पैसा कमावता येऊ शकतो पण वेळ पुरत नाही. तसंच स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी वेळ काढणंही अत्यंत कठीण आहे.

उद्योजकांना दिवसातील 24 तास फक्त आणि फक्त व्यवसायाबद्दलच विचार करावा लागतो. त्यामुळं प्रचंड ताण वाढतो. कधी कधी खूप राग येतो तर कधी-कधी एवढ्या दबावामुळं रडावसं वाटतं.

MOHAMED IRFAN/FB

फोटो स्रोत, MOHAMED IRFAN/FB

खूप खाल्ल्यानं कधीतरी फूड इन्फेक्शनही होतं. मी नियमितपणे 2 रुग्णालयांत जात असतो. मी जेव्हाही त्या ठिकाणी जातो तेव्हा डॉक्टरांना मला काय झालं असेल हे लगेचच लक्षात येतं. पण त्यामुळं वैद्यकीय उपचारांच्या निमित्तानं मिळणाऱ्या दोन दिवसांच्या सुटीचा मी आनंद घेतो. कारण तेव्हा काम करायचं नसतं काहीही चिंता नसते.

यूट्यूबवर हजारो क्रिएटर्स आहेत. आता यातून फारशी कमाई होत नसल्याचं ते सांगतात. पण तमिळनाडूमध्ये काही दर्जेदार क्रिएटर्स आहेत. तुम्ही लोकांना चांगल्या दर्जाचे व्हिडिओ दाखवले तर ते नक्कीच त्याचा आनंद लुटतात.

'चित्रपटसृष्टीच्याही आमच्याकडे नजरा'

हा अनुभव अत्यंत खास आहे. ज्यांना आपण चित्रपटात पाहतो ते आमच्याकडे येऊन मुलाखतीत सहभागी होतात हे फारच विशेष आहे. आधी यूट्यूबवर फक्त चित्रपटाचे ट्रेलर आणि रिव्ह्यूचे व्हिडिओ असायचे.

पण लोकांनीच यूट्यूबवरही चित्रपटातील कलाकारांना पाहणं पसंत केलं. त्यांनीच आमच्यासारख्या लोकांच्या कामाला प्रोत्साहन दिलं.

आता आम्ही या क्षेत्रात स्थान मिळवल्यानंतर त्यांच्या चित्रपटांच्या मुलाखती करणं योग्य असल्याचं मला वाटतं. त्यामुळं चित्रपटसृष्टीच्याही आमच्याकडं नजरा आहेत, असं वाटतं.

नेत्यांबरोबर मुलाखती कशा शक्य झाल्या?

मी डीएमकेच्या खासदार कनिमोळी यांच्याबरोबर पहिली राजकीय मुलाखत केली होती. तुतीकोरीन याठिकाणी एका फूड फेस्टिव्हलसाठी मला आमंत्रित करण्यात आलं होतं. त्याठिकाणी मला त्यांची मुलाखत घेण्याची संधी मिळाली.

तेव्हा पहिल्यांदाच एखाद्या राजकीय नेत्याबरोबर वीअर्ड फूड चॅलेंज केलं होतं. त्यात त्यांनीही सहभाग घेतला होता.

MOHAMED IRFAN/FB

फोटो स्रोत, MOHAMED IRFAN/FB

त्यांनी अगदी सहजपणे पदार्थांचा आस्वाद घेतला, पण आम्ही काहीसं घाबरतच व्हिडिओ शूट केला. कितीही झालं तरी त्या राजकीय नेत्या होत्या. त्याचा व्हिडिओही चांगला बनला होता.

पण राजकीय नेत्यांना संपर्क साधणं कधीकधी भीतीदायकही ठरू शकतं. कारण त्यांना कशाप्रकारच्या वातावरणाचा सामना करावा लागणार आहे, याचा त्यांना अंदाज नसतो.

डीएमकेचे युवक सचिव उदयनिधी यांचीही मुलाखत घेतली. पण ती मुलाखत त्यांनी एका चित्रपटात केलेल्या अभिनयासाठी दिली होती.

नॅशनल क्रिएटर्स अवॉर्डबाबत काय वाटतं?

मी कधीही हा शो पाहिला नाही. तसंही तामिळनाडूत कोणाला मिळणार नाही. भारतात हिंदीभाषिक लोक अधिक आहेत. भारतात त्यांची संख्या अधिक आहे. तमीळ बोलणारे लोक मात्र कमी आहेत.

त्यामुळं हिंदी भाषेतील क्रिएटर्सच यात सहभागी होऊ शकतात. त्यांनाच पुरस्कार मिळू शकतो. येणाऱ्या दिवसांत काय होतं ते पाहुयात.

यूट्यूबर्सवर अतिशयोक्तीचा आरोप का होतो?

माझा प्रामाणिकपणे काम करण्यावर विश्वास आहे. बदनामी करणं हे फार सोपं आहे. वाद निर्माण करणंही सोपं आहे. लोकांना ते आवडतही असतं. पण अनेक वर्षांपासून ज्या खाद्य पदार्थांच्या कंपन्या सुरू आहेत, त्यांच्याबद्दल चुकीच्या पद्धतीनं बोलणं हे योग्य नाही.

चुकीचा संदेश दिल्यानं अनेक ब्रँडचं नुकसान झालं आहे. काही तरी कमी-जास्त आहे, फार विशेष नाही असं म्हणणं, यामुळं त्यांच्या व्यवसायाला फटका बसतो. रेस्तराँमध्ये जाऊन त्याठिकाणी काय चांगलं आहे, याबद्दल बोलावं.

लोक कोणत्याही व्हिडिओवर कमेंट करत असतात. त्यांना सर्व माहिती असतं. काय चांगलं आणि काय वाईट आहे, याची लोकांना चांगली जाणीव असते.

'धमक्याही मिळतात'

मी दोन हजारांहून अधिक व्हिडिओ पोस्ट केले आहेत. कधी-कधी टीकेमुळं मला वाईट वाटतं. जेव्हा काही माध्यमातून कुठलीही खात्री न करता माझ्याबाबत बातम्या प्रसिद्ध केल्या जातात, तेव्हा मला वाईट वाटतं. असं करणाऱ्यांशी मी बोललो आहे.

काहींना त्यांची चूक लक्षात येते. ते सोशल मीडियावरून माझ्याबाबतचे व्हिडिओ डिलीट करतात. काहीजण वादविवादही करतात. तुम्ही कायद्याच्या मार्गाने जायचं ठरवलं तर ते कोण चालवत आहे? असा प्रश्न निर्माण होतो. कधी-कधी धमकीचे फोनही येतात.

'जबाबदारी असावी'

आपण प्रचंड जबाबदारीची जाणीव ठेवून वर्तन करणं अत्यंत गरजेचं असतं. विशेषतः मुलं व्हिडिओ पाहत असतील तर याची जास्त काळजी घ्यायला हवी.

तुमचे व्हिडिओ पाहण्यासाठी येणाऱ्या लोकांना योग्य बाबच सांगायला हवी. कधीही त्यांची दिशाभूल करू नका. मी फक्त एंटरटेनमेंट व्हिडिओ पोस्ट करतो.

यासाठी अधिक जबाबदार असणं गरजेचं आहे असं लोक म्हणतात. त्यामुळं प्रत्यक्ष घटना किंवा ऐतिहासिक न्यूज किंवा घटनांबाबत व्हिडिओ तयार करताना अधिक जबाबदारीनं वागायला हवं, असं मलाही स्पष्टपणे जाणवतं.